Vidhur | विदुर
'हे विदुरा, धृतराष्ट्रादी कौरवपुत्रांच्या राज्यात राहूनही तू नेहमीच धर्मशीलतेने, मोठ्या नीतिमत्तेने जगलास! द्रौपदी वस्त्र हरणाच्या प्रसंगी, इतर सारे ज्येष्ठ तोंड बंद करून बसलेले असताना, तू मात्र धृतराष्ट्राला, दुर्योधन- दुःशासनाला स्पष्टपणे आणि थेट बोललास! तू नेहमीच सत्याची बाजू घेतोस. प्रांजलतेची तू मूर्तीच आहेस. तू कधीही आणि केव्हाही कौरव आणि पांडव यात भेद केला नाहीस. गांधारीने आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधली असेल, पण तू, व्यासांच्या आदेशानुसार धृतराष्ट्राच्या सावलीत, सताड डोळे उघडे ठेवून त्याच्या सोबत राहतो आहेस. धृतराष्ट्राप्रमाणं कुंतीचीही तू अगदी मातापित्यांप्रमाणं काळजी घेतो आहेस. तू नेहमीच राजाला योग्य आणि नेमका सल्ला देत आलास ! मुख्य म्हणजे, महामंत्री या नात्याने तू आपला राजधर्म, स्वधर्म प्राणपणाने जपलास! सर्व प्रकारचे मिंधेपण तू नाकारलेस! दुर्योधन- धृतराष्ट्रानी तुला पांडवधार्जिणा म्हणून संबोधले, तरी तू कधीही पक्षपातीपणा केला नाहीस. तू सदैव ताठमानेने वावरलास ! खरोखरीच तू धन्य आहेस. कितीही आणि कसाही प्रसंग वा परिस्थिती आली, तरी तू आपला चांगुलपणा - भलेपणा, सात्विकता, साधेपणा, समंजसपणा, सत्यनिष्ठा, कर्तव्यपरायणता, सभ्यता कधीही आणि केव्हाही सोडली नाहीस. म्हणूनच तू मला आवडतोस!'